गेल्या काही दिवसांपासून दिवंगत आमदार पी. एन. पाटील -सडोलीकर यांचे पुत्र व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या चर्चेना उधाण आलेले आहे. त्या दिशेने ते वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. गावोगावी जाऊन ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. कार्यकर्त्यांची मते अजमावून घेत आहेत. राहुल पाटील यांनी ‘घड्याळ’ हातात घ्यावे यासाठी कार्यकर्त्यांची मानसिकता करण्यासाठी खास यंत्रणा कार्यरत आहे. स्व. आ. पी.एन. पाटील यांनी जपलेली काँग्रेस व निष्ठा सोडू नये हा एक मतप्रवाह आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षात जाऊन फारसे काही हाती लागणार नाही, त्यापेक्षा निष्ठा जपूया असा, विशेषत: जेष्ठ कार्यकर्त्यांचा एक मतप्रवाह आहे. अडचणीत असलेला भोगावती साखर कारखाना, सुत गिरणी या संस्था वाचवायच्या असतील तर सतेबरोबर जायला हवे. गोकुळ, जिल्हा बँक, बाजार समिती,एखादे महामंडळ अशा ठिकाणी वर्णी लावण्यासाठी सत्तेचा उपयोग होईल.आ. चंद्रदीप नरके यांचे वजन वाढल्याने कार्यकर्त्यांची कामे होणार नाहीत यासाठी सतेत जायलाच हवे अशी मानसिकता एका गटाची आहे. व त्याला राहुल व राजेश पाटील हे बंधू सहमत आहेत असे सध्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षात गेल्यास भोगावातीला संजीवनी मिळेल, सुतगिरणीचा भोंगा वाजेल, कार्यकर्त्यांना संधी मिळतील, कामे होतील व सर्वात महत्वाचे म्हणजे आ. चंद्रदीप नरके यांचा त्रास वाचेल या जमेच्या बाजू आहेत. तर काँग्रेस सोडल्यास आजोबा, वडिलांपासूनच्या पक्ष निष्ठेला तिलांजली मिळेल, संपूर्ण गट पाठीमागून येईल काय?, जिल्हा परिषद -पंचायत समिती, विधानसभेचे काय?आ. सतेज पाटील यांना मानणारा मोठा गट या मतदार संघात आहे, त्याचे काय होणार? इत्यादी तोट्याच्या बाजू दिसतात. गोकुळचे जेष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील हे सोबत येतील काय? ही सुद्धा विचार करण्याची गोष्ट आहे. एक आठवड्यापासून कार्यकर्त्यांचे आम्ही स्व. पी. एन. साहेबांचे निष्ठावंत असे स्टेटस दिसू लागलेले आहेत.एकंदरीत चाललेली वातावरण निर्मिती पहाता राहुल पाटील यांच ‘हातात घड्याळ’ बांधायचं ‘ठरलय’ असेच दिसून येत आहे.