दिवाळी सणाचा गोडवा वाढणार असल्याने उत्पादकांतून समाधान
बिद्री ता. १९ ( प्रतिनिधी ) : तोंडावर आलेल्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बिद्री ( ता. कागल ) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने वाढीव ऊसदराचा १०७ रुपयांचा दुसरा हप्ता आज सबंधीतांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी दिली. गत हंगामात गळितास आलेल्या ऊसाला ३४०७ रुपये अंतिम ऊसदर देणार असल्याची घोषणा कारखाना व्यवस्थापनाने केली होती. या आधी कारखान्याने दोन टप्प्यात ३३०० रुपये उत्पादकांना दिले होते. तर आता उर्वरीत १०७ रुपयांचा हप्ता दिल्याने कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून कारखाना व्यवस्थापनावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कार्यकारी संचालक चौगले म्हणाले, गेल्या सन २०२३-२४ च्या गळीत हंगामात कारखान्यात ९ लाख ५४ हजार ७७६ मे. टन ऊसाचे गाळप झाले असून त्यापासून ११ लाख ९८ हजार ७०० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. सरासरी उतारा १२.५५ इतका मिळाला आहे. त्यानुसार प्रतिटन ३२०० रुपये प्रमाणे रक्कम रुपये ३०५ कोटी ५२ लाख यापुर्वी अदा केले आहेत कारखान्याच्या निवडणूकीनंतर नुतन संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत प्रतिटन रुपये २०७ इतका वाढीव ऊसदर दोन हप्त्यात देण्याची घोषणा केली होती. गणेशोत्सवात पहिल्या हप्त्याची प्रतिटन १०० रुपये प्रमाणे होणारी रक्कम रुपये ९ कोटी ५२ लाख अदा केली आहे. कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उर्वरित १०७ रुपये दिवाळीला देण्याचे जाहिर केले होते. त्यानुसार दुसरा हप्त्याची रु. १०७ प्रमाणे होणारी रक्कम १० कोटी २१ लाख ऊस पुरवठादारांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. आजअखेर ३४०७ रुपये प्रमाणे होणारी २२५ कोटी २५ लाख रुपयांची रक्कम सबंधीतांना अदा केली आहे. यावेळी कारखान्याच्या विविध विभागांचे खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.