सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे आश्वासन
बिद्री साखर कारखान्याला सदिच्छा भेट
बिद्री/ विशेष प्रतिनिधी
चालू गळीत हंगामात ऊसाची कमतरता झाल्याने पुर्व हंगामी घेतलेल्या कर्जाची साखर कारखाने परतफेड करु शकत नाहीत. थकित कर्जामूळे पुढील वर्षाच्या हंगामासाठी कर्ज मिळणे अवघड असून कर्जाचे पुनर्घटन करण्यात यावे, या साखर कारखान्यांच्या मागणीवर शासन दरबारी विचार करु असे अश्वासन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले.
बिद्री ( ता. कागल ) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सदिच्छा भेटीप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर होते. दरम्यान मंत्री पाटील यांनी बिद्रीच्या यशस्वी प्रकल्पांची पाहणी करुन समाधान व्यक्त केले. यावेळी मंत्री पाटील यांचा श्री. महालक्ष्मीची मुर्ती देऊन अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मंत्री पाटील म्हणाले, एकेकाळी देशाच्या विकासाला चालना देणाऱ्या सहकार उद्योगाला आज अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतू ‘ बिद्री ‘ साखर कारखान्याने याही अडचणीच्या काळात साखर निर्मितीसह सहवीज व डिस्टीलरी प्रकल्प उभारुन अर्थिक स्थैर्य निर्माण केले आहे. सातत्याने ऊस दरामध्ये अग्रेसर राहून शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. कारखान्याच्या संचालक मंडळासह प्रशासन आदर्शवत काम करत आहे. बिद्री कारखान्याच्या माध्यमातून आपल्याला साखर उद्योगातील बारकावे माहिती करुन घेता आले असून याचा उपयोग राज्याच्या सहकारात आपण निश्चितच करणार आहे. या कारखान्याने राज्यातीलच नव्हे तर देशातील अन्य कारखान्यांना आदर्श वस्तूपाठ घालून दिल्याने हा कारखाना देशाच्या सहकार उद्योगासमोर ‘ रोल मॉडेल ‘ बनले आहे. याचा आदर्श इतर सहकारी संस्थांनी घ्यावा.
अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले, बिद्री साखर कारखान्याने साखर उत्पादनाबरोबर सहवीज प्रकल्प व डिस्टिलरी प्रकल्प राबवून कारखाना अर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. कारखान्यासमोरील अडचणींवर मात करीत कारखान्याने प्रगती साधली आहे. ६८ हजार सभासद व चार तालूक्यातील तमाम शेतकरी बांधवांच्या हितासाठी आम्ही सातत्याने कार्यरत आहोत.
यावेळी जॉईंट रजिस्टार महेश कदम, प्रादेशिक सहसंचालक गोपाळ मावळे, विशेष लेखापरीक्षक डी. बी. पाटील, किसनराव चौगले, विश्वनाथ कुंभार, धैर्यशील पाटील कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, व्यवस्थापकी संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांच्यासह खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आभार सेक्रटरी एस. जी. किल्लेदार यांनी मानले.
