कोल्हापूर :
एचआयव्ही संसर्गित रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, समुपदेशन व औषधोपचार यातील सातत्य यामुळे जिल्ह्यातील एड्स ने मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झालेली असून पुढेही एचआयव्ही संसर्गित रुग्णांना इतर कोणत्याही संधी साधू आजारांचा संसर्ग होऊ नये, तसेच संसर्गित व्यक्तीकडून इतरांना लागण होऊ नये हा दृष्टिकोन ठेवून काम करावे अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. जिल्हा एड्स नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या प्रसंगी ते बोलत होते.

एच.आय.व्ही. संसर्गित रुग्णांना दर्जेदार सुविधा देण्याबरोबर, एच.आय.व्ही च्या दृष्टीने जोखमीची असलेली ठिकाणे शोधून त्या ठिकाणी एचआयव्ही तपासणीचे काम वाढवावे. तृतीय पंथी व्यक्तींनी आपल्या गावामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नोंदणी करावी , सेक्स वर्कर महिलांनी सामान्य नागरीकाना त्रास होणार नाही अशा आचारसंहितेचे पालन करुन व्यवसाय करावा अशा सुचना त्यांनी दिल्या. जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर यांनी आकडेवारी सहित एच आय व्ही एड्स चे जिल्ह्यातील सद्यस्थितीचे सादरीकरण केले.
जागतिक युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर शालेय मुलांसाठी क्विझ, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी रेड रन मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे यांनी आभार मानले.
यावेळी विविध विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हयातील सर्व महादियालयांमध्ये ‘रेड रिबन क्लबची’ स्थापना
शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार एच.आय.व्ही.बाबतीत युवा विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने सर्व महाविद्यालयांमध्ये रेड रिबन क्लब स्थापन करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
